लोहारा प्रतिनिधी –
गोदावरी अर्बन बँकेचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ”गोदावरी अर्बन” च्या सास्तूर येथील शाखेमध्ये मोबाईल बँकिंग, एटीएम सुविधेचे लोकार्पण करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विधवा महिलांना साडी चोळीचे वाटप संस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी अर्बन व रुद्राराज इंडेनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एटीएम आणि मोबाईल बँकिंग लोकार्पण सोहळ्यात बोलताना अध्यक्षा राजश्री पाटील म्हणाल्या कि, नांदेडच्या गोदावरीचे उस्मानाबादच्या तेरणेला बळ मिळाले आहे. गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्रात अल्पावधीतच मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर आपला एक वेगळा ठसा उमटवला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात काळाची पावले ओळखून व्यवसाय करण्याची सचोटी बांधली आहे. मोबाईल बँकिंग आणि एटीएम ही नव्या युगाची सुविधाशस्त्रे हाती घेतली असून आपल्या असंख्य ग्राहकांना तत्पर व सुलभ सुविधा देण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच गोदावरी अर्बनच्या नांदेड येथील मुख्यालयाने मोबाईल बँकिंग आणि एटीएम सुविधेचा शुभारंभ करण्यात आला असून टप्याटप्याने सर्वच शाखांमध्ये सुरूवात करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सास्तूरच्या ग्रामीण भागातील शाखेमध्ये लोकार्पण करण्यात आले असल्याचे राजश्री पाटील म्हणाल्या. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, उत्तुंग झेप घेण्यासाठी गुणगौरव गरजेचा आहे त्यामुळे या कार्यक्रमात राजश्री पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या कि, गोदावरीने आपल्या यशाचे गमक म्हणून समाजातील सर्वसामान्यांना समोर ठेवून त्यांची समाजात स्वतःची पत निर्माण केली आहे, समूहामध्ये काम करीत असताना एका व्यक्तीने शंभर पावले चालली तर प्रगती नसून शंबर व्यक्ती पुढे येऊन एक पाऊल चालले त्याला प्रगती म्हणता येईल. त्यामुळेच सर्वाना सोबत घेऊन चालले पाहिजे.
गोदावरीने अर्बनने आजवर सर्वाना सोबत घेऊनच ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे. लॉकडाउनच्या काळात देखील आपला व्यवसाय स्थिर ठेवला असून आजवर अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले आहेत तसेच सास्तूर येथे आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि प्रेमामुळेच ”रुद्रराज इण्डेन” सुविधाही सर्व घराघरात पोहचली आहे. तुमच्या या प्रेमातून उतराई होण्याचं काम यापुढेही रुद्रराज इण्डेन करेल. आपल्या देशातील तरुण जर व्यवसायात पुढे आला तर नक्कीच देश प्रगतीपथावर राहील याकरिता लघुउद्योगाना अर्थसहाय्य देण्यासाठी गोदावरी अर्बन सदैव पुढे असेल असेही राजश्री पाटील म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, मेजर विष्णू वाघमारे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, माजी पंचायत समिती सभापती आसिफ मुल्ला, संचालक रब्बानी नळेगावे, माधवराव पाटील, रूद्रराज इंडेनचे व्यवस्थापक यशवंत सावंत, मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे, शाखाधिकारी अंकुश बिबेकर, उमाकांत जंगले, आदेश पवार, सिराज शेख, सोमनाथ कुंभार यांच्यासह परिसरातील ठेवीदार, सभासद, दैनिक ठेव प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.