वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून वैशाली खराडे तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी ( दि. ११) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेसचे प्रशांत काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदी वैशाली खराडे यांची निवड निश्चित झाली आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी शिवसेना ९ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे एकूण ११ जागी शिव राष्ट्र आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत दोन जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले. यापैकी अपक्ष निवडणूक लढविलेले अमीन सुंबेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे लोहारा नगरपंचायतमध्ये शिवराष्ट्र आघाडीचे संख्याबळ हे १२ झाले आहे. त्यामुळे नगरपंचायतीची सत्ता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराष्ट्र आघाडीच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मंत्रालयात नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत झाली. यात लोहारा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे खुला प्रवर्गासाठी सुटले. त्यानंतर नगराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे नगरसेवकांसह शहरवासीयांचे लक्ष लागले होते. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार दि. ८ रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करावयाचा होता. त्यामुळे मंगळवारी (दि.८) सकाळी उमरगा येथे नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत इच्छुकांची मते विचारात घेऊन नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका वैशाली खराडे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर वैशाली अभिमान खराडे यांनी मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. तसेच काँग्रेसकडून नगरसेवक प्रशांत काळे यांचाही अर्ज दाखल करण्यात आला होता.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुक्रवारी (दि.११) काँग्रेसचे प्रशांत काळे यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वैशाली अभिमान खराडे यांच्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु अधिकृत घोषणा सोमवारी (दि.१४) होणार आहे. नगराध्यक्ष निवड करण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता नगरपंचायत कार्यालयात नगरपंचायतीच्या सर्व सदस्यांची विशेष सभा होणार आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश पवार राहणार आहेत. त्याच दिवशी सकाळी १० ते १२ या कालावधीत उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याच सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे.