वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
निवासी दिव्यांग शाळा,सास्तूर व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, सास्तूर येथील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजन समितीच्या माध्यमातून रविवारी (दि. २५) स्नेह मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा पतंजली परिवाराचे जिल्हा संरक्षक पांडूरंगजी कचोलिया हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करून शाळेने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी योगा, प्राणायाम व ध्यानधारणेचा आपल्या जीवनात अवलंब करून आयुष्य अधिक सुंदर व सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे. शाळेच्या या मानवतावादी कार्यास आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटक श्री सद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट, श्री केशव बालाजी देवस्थान औसाचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड म्हणाले की, निवासी दिव्यांग शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांपैकी जे गुणवंत आहेत व बिकट आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यांना केशव बालाजी देवस्थानच्या माध्यमातून दत्तक घेऊन, त्यांचे उच्च शिक्षण अखंड सुरू राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन केले. तसेच प्रशालेची माजी दिव्यांग विद्यार्थीनी कु. स्वप्नाली संजय पुजारी हिला तिच्या उच्च शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचे घोषित केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिशा प्रतिष्ठान लातूरच्या प्रकल्प समन्वयक ॲड. वैशाली लोंढे-यादव या म्हणाल्या की, माजी दिव्यांग विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याची प्रशालेची संकल्पना अत्यंत चांगली असून, भविष्यात दिशा प्रतिष्ठान निवासी दिव्यांग शाळेतील गरजूंना उच्च शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याचे अभिवचन दिले. त्यासोबतच त्यांनी विविध फळझाडांची २५ रोपे शाळेला भेट दिली. व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
निवासी दिव्यांग शाळा व स्पर्श रूग्णालय हे सास्तूर गावचे भूषण आहेत. त्यांना सास्तूर गावची प्रथम नागरिक म्हणून आवश्यक ती मदत व सहकार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन सास्तूरच्या नुतन सरपंच शितलताई पाटील यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल दादा पाटील व नुतन सरपंच शितलताई पाटील या दाम्पत्याच्या वतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेला प्रशालेचा माजी दिव्यांग विद्यार्थी धिरज सोठ, उमेद जीवनोन्नती अभियानातील समन्वयक माजी विद्यार्थीनी कु. मंगल गायकवाड, पेशाने स्थापत्य अभियंता असलेला व उमरगा तालुक्यातील बेळंब ग्रामपंचायतीचा नवनिर्वाचित सदस्य माजी विद्यार्थी लाडाप्पा बंदिछोडे, किल्लारी येथील यशस्वी उद्योजक तथा प्रशालेचा माजी विद्यार्थी दिनेश दंडगुले तसेच आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा वाशिम जिल्हा समन्वयक पूर्ण वेळ कार्यकर्ता योगेश शेळके, कॉग्नीझंट या आयटी कंपनीत कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनिअर कु. प्रगती जाधव, पुणेस्थित स्थापत्य अभियंता दशरथ जगताप, हसलगण येथील आदर्श दिव्यांग शेतकरी अजित मुरटे, रामचंद्र प्राथमिक विद्यालय वांगजेवाडी येथील प्राथमिक शिक्षिका शकुंतला वाघमारे आदी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शॉल, फेटा व बुके देवून शितलताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी म्हणाले की, निवासी दिव्यांग शाळा दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहे. निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर व स्पर्श रूग्णालय परस्पर समन्वयाने दिव्यांगांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे मागील १३ वर्षांपासून यशस्वी आयोजन करीत आहेत. त्याचा १३६७ दिव्यांगानी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. याप्रसंगी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील प्राध्यापक नरसिंग शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, सास्तूर निवासी दिव्यांग शाळा हे कुशल व सामाजिक भान असलेले मनुष्यबळ निर्माण करणारे केंद्र आहे. या ठिकाणच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भागवतराव बदामे, बलसूर येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णूदास तोष्णीवाल, ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीचे माजी मुख्य प्रबंधक बसवराज करपे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, किल्लारी चे विभागीय केंद्रप्रमुख सदाशिवराव साबळे, सोलापूर येथील प्रसिद्ध कवी भगवान चौगुले, लातूर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील अधिक्षक सुनंदा अकनगीरे, वन्यजीव संरक्षण समितीचे अभिजीत गायकवाड, आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष इसाकभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजन समितीचे अध्यक्ष किरण गायकवाड, उपाध्यक्ष शौकतअली मासुलदार, निसर्गोपचार केंद्राचे विवेकानंद चामले आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजन समितीच्या वतीने निवासी दिव्यांग शाळा,सास्तूर व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवा कृतज्ञता सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी जमवलेल्या वर्गणीतून प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन हॉल बांधण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी आजी-माजी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य व विविध कलागुणांचे सादरीकरण करून सास्तूर वासियांचे मनोरंजन केले. कार्यक्रमास सास्तूर गावातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी केले. सूत्रसंचलन प्रयागताई पवळे व रोहिणी राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी किरण गायकवाड, शौकत मासुलदार, प्रयागताई पवळे, दिनेश दंडगुले, किशन पवार, महंमद हानिफ, अमोल येवते, मैनुद्दीन लद्दाफ, अनिल कुंभार तसेच प्रशालेतील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.