वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालविवाह प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त शासनाच्या आदेशाप्रमाणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंतदादा पाटील हायस्कुल व नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यु. व्ही. पाटील होत्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. मगर मॅडम, लोहारा येथील महिला पोलीस कर्मचारी कान्होपात्रा तेली, रंजना हासुरे उपस्थित होत्या. महिला पोलीस कर्मचारी कान्होपात्रा तेली यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धारी हे जरी खरं असलं तरी तिने स्वतः कडे लक्ष देणे, स्त्रीने स्वतः कडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच मुलींना कायद्याची माहिती सांगून मुलींमधील आत्मविश्वास जागा केला. लोहारा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. मगर मॅडम यांनी मुलींना बाल विवाहामुळे होणारे शारीरिक नुकसान याबाबत माहिती दिली. प्राचार्या यु. व्ही. पाटील यांनी समुपदेशनाचा उद्देश व मुलींचा आत्मविश्वास कसा जागृत करायचा याबाबत मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला. या कार्यशाळेला पौर्णिमा घोडके, सुलोचना रसाळ यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डी. व्ही. धनवडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.