वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यासह वाशी, भूम व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ अनुदान देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे. बुधवारी (दि.१४) लोहारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यामध्ये सततच्या होत असलेल्या पावसामुळे व सरासरीपेक्षा अधिक पावसाने झोडपले असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील नगदी पीक सोयाबीन सह अनेक पिके वाया गेले आहेत. तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी रोटर फिरवून चक्क सोयाबीन ची वाढ खुंटल्याने ट्रॅक्टर फिरवला आहे. तर अनेकांनी तण नाशकाची फवारणी करून सोयाबीन नष्ट केले आहे. सततच्या पावसामुळे नदीपात्रात जनावरे देखील वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी विजेचा कहर तर अनेकांच्या घरांची पडझड झाली असताना देखील शेतकऱ्याना अनुदानापासून डावलण्यात आले आहे.
तालुक्यामध्ये सोयाबीन पिकांची वाढ तर खुंटलीच शिवाय शँखी गोगल गायीच्या धुमकुळाने शेतकरी राजा तूर्त बरबाद झाला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केंद्रातील पथक तसेच जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींनी पाहणी केली आहे. तरी देखील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे नुकसान अहवालानुसार शासनाला कसे काय दिसले नाही ? उस्मानाबाद जिल्ह्याला ९० कोटी ७४ लाख रूपये मंजूर झाले आहेत. परंतु या अनुदानातून लोहारा, भूम, वाशी, उस्मानाबाद या चार तालुक्यांना वगळण्यात आले आहे. अनुदान मिळेल या अपेक्षेने बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची शिंदे-फडवणीस सरकाराने अपेक्षा भंग केली आहे.
८ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून महसूल व वन विभागाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लोहारा तालुक्यात सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला आहे. पावसाचा अतिरेक झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतजमिनी मधील माती वाहून गेल्या आहेत. एवढे पावसाचे रौद्ररूप असताना देखील लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळू शकत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसामुळे नुकसान झाले असताना राज्य शासनाने मात्र आठ तालुक्यापैकी केवळ चार तालुक्यांना अनुदान जाहीर करून उर्वरित चार तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यासाठी शासनाने पुनश्च विचार करून लोहारा, भूम, वाशी व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटप करावे अन्यथा समस्त शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा पुढील होणाऱ्या घटनेस सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय नरवडे, तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, कार्याध्यक्ष बालाजी यादव, तालुका उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, सचिव शरद जावळे महादेव मगर, गोविंद गोरे, गणेश पवार, प्रतिक गोरे, सोमनाथ भोजराव, गोपाळ बिराजदार, तानाजी पाटील, विठ्ठल रणखांब, राहुल सुरवसे, शेतकरी अनंत पवार, बसवराज वाळके यांच्यासह महिला, शेतकरी उपस्थित होते.