वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. कोणत्या मतदारसंघात कोण इच्छुक आहे, मतदारसंघात कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडेल याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. त्याप्रमाणे व्युव्हरचना करण्यात येत आहे. मिनिमंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठी रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. १३ जुलैला होणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ जुलै रोजीच्या पत्राद्वारे कळविले होते. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला. आता निवडणुका काही काळ होणार नाहीत या विचारात राजकीय पक्ष असतानाच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा निकाल दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार गुरुवारी (दि. २८) आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषद आरक्षण सोडत उस्मानाबाद येथे जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात तर पंचायत समितीचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात होणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण सोडतीनंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लोहारा तालुक्यात यापूर्वी कानेगाव, माकणी, सास्तुर, जेवळी हे चार गट व आठ गण होते. मागील निवडणुकीत चारही ठिकाणी महिला सदस्य होत्या. चारपैकी काँग्रेस (आय) ने माकणी, जेवळी या दोन ठिकाणी विजय संपादन केला होता. तर सास्तुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस व कानेगावची जागा शिवसेनेकडे होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या गटांच्या पुनर्रचनेत एका नव्या गटाची निर्मिती झाली आहे. आष्टाकासार हा नवा गट तयार झाला आहे. त्यामुळे तालुक्यात आता ५ गट व १० गण झाले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. कोण कोणासोबत आघाडी करणार की सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार हे सध्या तरी स्पष्ट झाले नाही. मागील काही दिवसांपूर्वी राज्यात बदललेल्या सत्ता समिकरणांचा मोठा परिणाम या निवडणुकीवर होईल अशी शक्यता आहे. कारण मागील निवडणुकीत भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. परंतु आता तशी परिस्थिती नाही. या निवडणुकीत भाजपाही जोरदार तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरेल असे बोलले जात आहे. उद्या होणाऱ्या आरक्षण सोडतीवर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. मागील काही महिन्यांपासून इच्छुकांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. काही ना काही कारणांच्या निमित्ताने इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क ठेवला जात आहे. एकंदरीत यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे हे मात्र नक्की.