वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह संपूर्ण तालुक्याचे सन १९५३ पूर्वीचे खासरा पाहणी पत्रक, फसली १३५७, ७/१२, ८ अ, उतारे, जनगणना, युनिट रजिस्टर यासह आदी अत्यावश्यक असणारी अभिलेख रेकॉर्ड उमरगा तहसील कार्यालयातून ताब्यात घेऊन लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी नागरिक व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे गुरुवारी (दि.२२) निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, लोहारा तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २३ वर्षे उलटली अद्यापही सन १९५३ पूर्वीचे जुने खासरा पाहणी पत्रक, फसली १३५७, ७/१२, ८ अ, उतारे, जनगणना, युनिट रजिस्टर यासह आदी अत्यावश्यक असणारी अभिलेख रेकॉर्ड, व कागदपत्रे उमरगा तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात असल्याने लोहारा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना जुन्या नकला व कागदपत्रे काढण्यासाठी उमरगा तहसील कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून हेलपाटे घालावे लागत आहे.
सतत उमरगा तहसीलमध्ये कागदपत्रे काढण्यासाठी जाऊन ही अभिलेख रेकॉर्ड सापडत नाही, शोध घ्यावा लागेल वेळ लागेल, उद्या या, परवा या, तुमचे रेकॉर्ड लोहारा तहसील कार्यालयात आहे तेथून घ्या असे तेथील कर्मचारी सांगत आहेत. त्यानंतर लोहारा तहसील कार्यालयात रेकॉर्ड मागणीसाठी शेतकरी व नागरिक आले असता सन १९५३ पूर्वीचे संपूर्ण रेकॉर्ड हे उमरगा तहसीलमध्ये उपलब्ध असून तुम्ही तेथून घ्या असे सांगितले जात असल्याने शेतकरी व नागरिकांची मोठी कुचंबना होत असून दोन्ही तालुक्याच्या तहसीलचे उंबरठे झिजवूनही रेकॉर्ड मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे आपल्या स्तरावरून लोहारा तालुक्याचे खासरा पाहणी पत्रक, फसली १३५७, ७/१२, ८ अ, उतारे, जनगणना, युनिट रजिस्टर यासह आदी अत्यावश्यक असणारी अभिलेख रेकॉर्ड उमरगा तहसील कार्यालयातुन हस्तगत करुन लोहारा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात उपलब्ध करुन देऊन शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी, येत्या ८ दिवसात संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध करून न दिल्यास लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक धनराज बिराजदार, तालुकाध्यक्ष बालाजी यादव, किरण सोनकांबळे, लक्ष्मण लोहार, खंडू शिंदे, गणेश सुरवसे, पदमाकर चव्हाण, स्वप्नील गुंड, शरद जावळे, अभिजित सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, सत्यजित मुसांडे, ओमकार चव्हाण, अब्बास कारभारी, विजय जाधव, अमोल बिराजदार, संजय खरूसे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.