लोहारा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार (दि.७) पर्यंत एकूण २२४ ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. परंतु यापैकी ११५ ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. या प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छानणी बुधवारी (दि. ८) होणार आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी मागील काही दिवस इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मंगळवारी (दि. ७) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांकडून निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांच्याकडे पक्षाच्या उमेदवारांसाठी आवश्यक असणारे ए बी फॉर्म सुपूर्त करण्यात आले. परंतु बंद पाकिटात कोणाकोणाचा ए बी फॉर्म असेल, त्यात आपला ए बी फॉर्म आहे की नाही याची उत्सुकता इच्छुकामध्ये दिसून येत होती. एबी फॉर्म बाबत सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण कोण आहेत हे बुधवारी होणाऱ्या छानणी दरम्यान माहिती होणार आहे.
दरम्यान सोमवारी (दि.६) सायंकाळी ओबीसी आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी पसरली. या बातमीमुळे इच्छुकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. निवडणूक होणार की नाही, ओबीसी प्रवर्गाकरिता आरक्षित चार प्रभागाच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेईल असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ७) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने त्यासंबंधी राज्य निवडणूक आयोगाकडून काय सूचना येतात याची प्रतीक्षा निवडणूक निर्णय अधिकारी करत होते. परंतु ओबीसी प्रवर्गागील उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करायला आल्यावर अद्याप निवडणूक आयोगाकडून कसलेही आदेश आले नाहीत. थोड्या वेळात जे आदेश प्राप्त होतील त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाकडून काय आदेश येतो याकडे लागून राहिले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून दुपारी अडीचच्या ओबीसी आरक्षणसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातील निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. तसेच उर्वरित प्रभागातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे होईल अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी उपस्थित सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांना दिली. ही माहिती ऐकताच ओबीसी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ या चार प्रभागाच्या निवडणुकीस स्थगिती मिळाली आहे. आता उर्वरित १३ प्रभागासाठी निवडणूक होणार आहे.
८ डिसेंबर ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. त्यानंतर दि. २२ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.