वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कृषिप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडची गरज आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार व्यक्त केले आहे.
प्रबोधनकार ठाकरे जयंती व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडच्या वतीने (दि.१७) मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, प्रदेश सह संघटक मनोज गायकवाड, दौलतराव घोलकर, जिल्हाध्यक्ष शरद पवार, जिजाऊ ब्रिगेड उमरगा तालुकाध्यक्षा सत्यवती इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले की, आपल्या देशात सर्व गोष्टींचा भाव ठरवण्यात येतो. परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरवला जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. कृषिप्रधान असलेल्या आपल्या या देशांमध्ये जर शेतकऱ्यांच्या मुलांना आत्महत्या करायची वेळ येत असेल तर ही व्यवस्था आपण बदलणार आहोत की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठीच संभाजी ब्रिगेड राजकारणात आली आहे. २०२४ साठी एक नवं ध्येय, विचार घेऊन संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे. संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची युती झाल्यापासून अनेक जण हैराण झाले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक मावळा मोठ्या ताकतीने मैदानात उतरणार आहे. आपल्या देशावरती कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर करून ठेवला आहे असे सांगून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देशाची, राज्याची वाट लावली असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच या देशात धर्माच्या नावाखाली राजकारण केले जाते. या देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य तरुण, नागरिकांना न्याय देण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश सहसंघटक मनोज गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. धनराज बिराजदार यांची जिल्हा जिल्हा संघटक पदी, अक्षय नरवडे यांची जिल्हा सचिव पदी, बालाजी यादव यांची लोहारा तालुकाध्यक्ष पदी, किरण सोनकांबळे यांची कामगार आघाडी तालुकाध्यक्ष पदी, महादेव मगर यांची तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदी तर अण्णासाहेब पवार यांची उमरगा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी केले. सूत्रसंचालन धनराज बिराजदार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विठ्ठल सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, गोविंद गोरे, खंडू शिंदे, अभिजित सूर्यवंशी, दत्ता भोजराव, ओंकार चव्हाण, गणेश सुरवसे, धनराज गिरी, सुरज गादे, अस्लम कारभारी, अनंत पवार, लक्ष्मण लोहार, सुरज ओवंडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यापुर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.