वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जेदार आरोग्य सेवेबरोबरच मानवतावादी दृष्टिकोनामुळे व सामाजिक बांधीलकीची जान असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे निराधार ६० कुटुंबाचे दुख काही प्रमाणात हलके करण्याचे काम ग्रामीण रुग्णालय स्पर्श मुळे होत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी (दि.१७) आयोजित कार्यक्रमात केले.
तालुक्यातील सास्तुर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के.पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाने ही आर्थिक मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यातील अनेक कुटुंबामध्ये कर्त्या व्यक्तीचे निधन झाले. त्यातही ज्या कुटुंबात १८ वर्षाच्या आतील लहान मुले आहेत व कुटुंबाला इतर कोणाचा आधार नाही अशा कुटुंबाची आर्थिक टंचाईमुळे, उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तर या विधवा मातेला तसेच तिच्या मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन स्पर्श ग्रामीण रूग्णालयाद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील तसेच लातूर जिल्ह्याच्या औसा, निलंगा तालुक्यातील कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या कोरोनामुळे निधन झाले आहे व ज्या कुटुंबातील १८ वर्षाखालील मुले आहेत व उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही अशा ६० निराधार कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना गिव्ह इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरच्या सहकार्याने शुक्रवारी (दि.१७) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व मान्यवराच्या हस्ते अशा निराधार कुटुंबातील विधवा महिलांना रु. ३०,०००/- चा धनादेश देण्यात आला. या रकमेच्या साहाय्याने या कुटुंबाना उभारी घेण्यास नक्कीच मदत होईल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाने ही आर्थिक मदत धनादेशाद्वारे देण्यात आली.
यावेळी डॉ. अशोक कटारे म्हणाले कि, येत्या काही दिवसात लोहारा तालुक्यातील संपूर्ण गावांचे आरोग्य विभागाच्या वतीने १०० टक्के लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी १०० टक्के लसीकरण करणे अतिशय महत्वाचे आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित करूनच आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करू शकतो. कोविड लसीकरणामध्ये सास्तूर गावाचे १०० टक्के लसीकरणासाठी सहकार्य केलेल्या आशा कार्यकर्तींचे मान्यवरांच्या हस्ते साहित्य व रूग्णालया तर्फे छोटीसी आर्थिक भेट व सुरक्षा किट वाटप करून सत्कार करण्यात आला. तसेच ४ फिरत्या वैद्यकीय पथका मार्फत १२५ गावांमध्ये लसीकरण व कोविड -१९ रॅपिड टेस्ट करण्यास सहकार्य केलेल्या आशा कार्यकर्त्याचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. महिला व बालकांसाठी देण्यात येत असलेल्या दर्जेदार आरोग्य सेवेचे मान्यवरांनी कौतुक केले. प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी स्पर्श रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील लाभार्थी, नातेवाईक, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मनीष सिन्हा, डॉ. मीरा देशपांडे, डॉ. दीपिका चिंचोळी, डॉ. रहीम पटेल, तुकाराम गायकवाड, अच्युत आदटराव व स्पर्शचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव यांनी तर तुकाराम गायकवाड यांनी आभार मानले.