वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ज्ञान प्रबोधिनी हराळी संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर व लोहारा या २ तालुक्यातील १२ तांड्यावर २०२० या वर्षांपासून आनंद शाळा हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. ऊस तोडीसाठी बाहेर पडलेल्या पालकांसोबत मुलेही जातात त्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रापासून दूर जातात. त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात त्याचा विपरीत परिणाम होतो. याच बाबी लक्षात घेऊन विविध तांड्यावरील ऊस तोड कामगारांचे ५० मुले ज्ञान प्रबोधिनी संस्थेत राहुन शिक्षण घेत आहेत. तांड्यावरील सुशिक्षित युवक व युवतींना संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाते. तेच युवक- युवती प्रत्यक्ष जाऊन आपल्या तांड्यावरील मुलांसाठी नियमित शैक्षणिक, सामाजिक उपक्रम घेत असतात. याचाच एक भाग म्हणून सेवालाल महाराज जयंती निमित्त १२ तांड्यावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात पालकांसोबत ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रातिनिधिक स्वरूपात ज्ञान प्रबोधिनी संस्थेत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे, कृषी विद्यालयाच्या प्राचार्या गौरी कापरे, केंद्र व्यवस्थापक सुहास पाठक, समन्वयक सुरज रसाळ यांच्यासह तांड्यावरील इतर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.