वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील तीन चार दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात कुरुंदा गाव आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्याना पूर आला आहे. पुराचे पाणी कुरुंदा गावात शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू सुद्धा पाण्यात वाहून गेल्या आहेत. ही घटना घडल्याबरोबर तातडीचा मदतीचा हात त्या पूरग्रस्तांना मिळावा या भावनेने गोदावरी अर्बन बँकेच्या कुरुंदा शाखेतील कर्मचाऱ्यांना नांदेड येथील गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी फोनवरून सूचना करताच अवघ्या दोन तासात पूरग्रस्तांना तात्पुरती का होईना पण मदत मिळावी या संवेदनेने ९ जुलै रोजी गोदावरी अर्बन, कुरुंदा शाखा व गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने पुरग्रस्त कुटुंबीयांना तातडीने खिचडीचे वाटप करून मद्तीचा हात पुढे करण्यात आला.
कुरुंदा गावावर हे नेहमीचेच संकट असून हे गाव लवकरच पूरमुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. या सामजिक कार्यात कुरुंदा शाखेचे शाखा व्यवस्थापक बालाजी खराटे, कनिष्ठ अधिकारी राजू भोसले व संतोष गोलेवार यांच्यासह कुरुंद्यातील युवकांनी सहकार्य केले.