लोहारा : लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायती तसेच नव्याने स्थापीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, वडगाव गांजा, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. गावपुढाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केली होती. मागील काही दिवसांत उमेदवारांच्या चाचपणीसाठी गावोगावी गुप्त बैठका होत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच सरपंच पद ही जनतेतून निवडले जाणार असल्याने सरपंच पदासाठी कोणता उमेदवार द्यायचा यासाठीही बैठका झाल्या.
या १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून २ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. ५ डिसेंबर ला प्राप्त नामनिर्देशन पत्राची छानणी होईल. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. त्यानंतर त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. १८ डिसेंबर ला मतदान होणार असून २० डिसेंबर ला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.