लोहारा :
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
राज्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायती तसेच नव्याने स्थापीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने संगणकीय प्रणालीवर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात येणार असून यासाठी ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या अनुषंगाने लोहारा तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाने गुरुवारी (दि.६) एक पत्र काढले आहे. त्यानुसार तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार दि. १३ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दि. १३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायतीमध्ये तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, वडगाव गांजा, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. वरील १३ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा फड लवकरच रंगात येणार असल्याचे स्पष्ट होत असून गावपुढाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मागील दोन तीन महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपली ताकत दाखवण्याची ही संधी आहे. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.