वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
राज्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायती तसेच नव्याने स्थापीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले होते. या निवडणुकीच्या अनुषंगाने संगणकीय प्रणालीवर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली असून यासाठी ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार दि.१३ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर निवडणूक आयोगाने हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायतीमध्ये लोहारा तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, वडगाव गांजा, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. वरील १३ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा फड लवकरच रंगात येणार असून गावपुढाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मागील दोन तीन महिन्यात झालेल्या राजकीयउलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपली ताकत दाखवण्याची ही संधी आहे. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने आता यापुढील काळात काय काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
———–
असा आहे निवडणुक कार्यक्रम
नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख – १८ नोव्हेंबर
नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी – २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
नामनिर्देशनपत्र छानणी – ५ डिसेंबर
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख – ७ डिसेंबर (दुपारी ३ पर्यंत)
चिन्ह वाटप – ७ डिसेंबर
मतदान – १८ डिसेंबर
मतमोजणी – २० डिसेंबर