वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022 – 23 अन्वये भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धा 2022 या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत लोहारा तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने भूमिका अभिनय तसेच लोकनृत्य जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दोन संघ सहभागी झाले होते. लोकनृत्य स्पर्धेसाठी मुले व मुलींसाठी समान संधी, मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबाची भूमिका, पर्यावरण संरक्षण, मादक द्रव्याचे सेवन रोखणे, प्रौढावस्थेतील निरोगी नातेसंबंध हे विषय सादरीकरणासाठी होते. सास्तुर निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थी अल्ताफ रऊफ चौधरी, कुमारी संध्याराणी बिभीषण कदम,कु. किरण बाळू खराते, सूर्या लहू शिंदे, कुमारी भाग्यश्री कांबळे, महेश पवार, भाग्येश इस्लामपूरे, कुमारी आदिती गायकवाड या विद्यार्थ्यांनी मुले व मुलींसाठी समान संधी या विषयावर बहारदार लोकनृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकून लोकनृत्य स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम पारितोषिक पटकावले. सदर स्पर्धेत प्रत्येक तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धा मधून प्रथम क्रमांकाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जि.प. प्रा. शाळा, जवळा तालुका परांडा तर तृतीय क्रमांक जि. प. प्रा. शाळा, वाशी या संघाने मिळवले पुढील आठवड्यात विभागीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी सास्तूर निवासी दिव्यांग शाळेचा संघ पात्र ठरला आहे. विजेत्या संघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे ,अंजली चलवाड, शंकरबावा गिरी, सुरेखा परीट, संजय शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादचे प्रयार्य डॉ. दयानंद जटनूरे, डायटच्या लोकसंख्या शिक्षण विभागाच्या आधिव्याख्याता सुचित्रा जाधव, डायट उस्मानाबादचे अधिव्याख्याता डॉ. सलगर श्री पौळ सर, स्पर्धेचे परीक्षक राजेंद्र अत्रे (दादा), विवेक कोरे, श्रीमती भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या संघातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे गट शिक्षणाधिकारी पं.स. लोहारा रंजना मैंदर्गी, माकणी बीटचे विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार, स्पर्धेचे लोहारा तालुका समन्वयक काळे एस एम, सुधाकर मुगळीकर, केंद्रप्रमुख नयन शेख संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे मुख्याध्यापक.बी.टी. नादरगे आदींनी अभिनंदन केले आहे तसेच तालुक्यातील शिक्षण प्रेमी नागरिकाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
———–
मी लहानपणी एका अपघातात माझा डावा पाय गमावलेला आहे.कृत्रिम पाय वापरून नृत्याचा सराव करीत असताना माझ्या पायाला जखम झाली.मला त्यामुळे कृत्रिम पाय काढून ऐनवेळी एका पायावर नृत्य केले.मी एका पायावर नृत्य करतोय याचे भान हरपून मी स्पर्धेत नृत्य केले.आम्हाला प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे.
सुर्या शिंदे,
दिव्यांग विद्यार्थी कलाकार,
निवासी दिव्यांग शाळा सास्तूर