वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील “आष्टा हायस्कूल आष्टा कासार” या शाळेतील सन १९८३ च्या १० वी च्या वर्गातील सर्व (५५) विद्यार्थी वर्ग मित्र, मैत्रीणी हे ३९ वर्षा नंतर रविवारी दि. ३० आक्टोबर २०२२ रोजी आपल्या शाळेत एकत्र येऊन स्नेहसंमेन साजरे केले.
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन या बॅचच्या माजी विद्यार्थ्यानीच केले होते. एकूण ६६ विद्यार्थ्यापैकी ५५ विद्यार्थी त्यात १३ मुली (त्यांच्या नातवंडाबरोबर) व १२ शिक्षक, कर्मचारी ( सर्व सेवानिवृत्त) संस्थाचालक व गावातील मान्यवर इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. शिवशंकर स्वामी गुरुजी होते. दिप प्रज्वलन करून व दिवंगत शिक्षक, विद्यार्थि, कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली.
सुरुवातीला राष्ट्रगीत व प्रार्थना झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सयाजी शिंदे यांनी केले. त्यानंतर ॲड. विरसंगप्पा आळंगे, अधीक्षक अभियंता अजित मदने, डॉ. सुवर्णा पोतदार, सौ. गंगुबाई स्वामी, बाबुराव सोमवंशी, गुंडू सोमवंशी, अनिल चिलोबा, सौ. जगदेवी पाटील, सौ. कालिका स्वामी, सौ. बबिता दलिंबकर, सौ. वैजयंती माळी, माजी सरपंच पंडित कागे आदी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. त्यात शाळेत शिकलेल्या संस्काराचा उपयोग बाहेरच्या जीवनात कसा झाला याचे अनेक किस्से व्यक्त केले व आपल्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांनतर निवृत्त शिक्षक श्री. विष्णू सगर गुरुजी, फुंडीपल्ले गुरुजी, श्री. एल. एन. पाटील गुरुजी ई. आशीर्वाद पर मार्गदर्शन करताना या विद्यार्थ्यांच्या अनेक आठवणी सांगून कौतुक केले. अध्यक्ष स्वामी गुरुजी यांनी अध्यक्षीय समारोप करताना अनेक आठवणी सांगून या विद्यार्थ्यांनी बाहेरच्या जगात कमावलेले मान सन्मान, भूषवलेली पदे, आपल्या क्षेत्रात केलेली प्रगती ई.चा उल्लेख करून कौतुक केले व शाळेसाठी काहीतरी करण्याच्या धडपडीचे अभिनंदन केले. जेवणानंतर या परीवरातीलच युवा गायक सुजित माने याचे गायन व कौतुक झाले. त्याला तबला साथ नरसिंग पांचाळ, हर्मोईयमवर सुनिल माने यांनी दिली. त्यानंतर मुलांनी उपस्थित मुलींसाठी माहेरची साडी व मुलींनी मुलांना भेटवस्तू दिल्या. शेवटी सुनिल माने यांनी आभार प्रदर्शन केले. अत्यंत खेळीमेळीच्या व भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्गमित्र, मैत्रीणी खूप दुर दूर वरून देशातील विविध शहरातून व काहीजण परदेशातून आलेले होते. गावातील नागरिक, नातेवाईक ई. बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. आळंगे, ॲड. सयाजी शिंदे, दिलीप चौधरी, दिगु दाशिमे, मकबूल शेख, गुंडू सोमवंशी, डॉ. सुवर्णा पोतदार, प्रविण चौधरी, गंगाधर बलसुरे, सौ.सविता सगर (मा. नगरसेविका अंबाजोगाई) व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.