लातूर :-
जिल्हाधिकारी तथा आयुक्त लातूर महानगरपालिका पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार लातूर शहरात सुरू होणार स्वच्छतेचा लातुर पॅटर्न. त्याकरिता मोठ्या स्तरावर स्वच्छता अभियान राबिविण्यात येत आहे.
त्यानुसार लातूर महानगरपालिका यांनी प्लास्टिक बंदी या विषयावर प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या संदर्भात लातूर नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांच्यासोबत कचरा संकलनाची पाहणी करत असताना एका नागरिकांनी कचरा घेऊन येत असताना त्यामध्ये वापरलेल्या थर्माकोलच्या प्लेट्स आणल्या. त्यावरून त्याला प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी अधिनियमानुसार 5 हजार रुपयांचा तात्काळ दंड आकारण्यात आला.
प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी अधिनियमानुसार अधिसूचनेनुसार प्लास्टिक व थर्माकोल विक्रेता व वापर करणारे दोघेही दंडास पात्र असल्याने सदरचा दंड करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यापुढे दुकानातून प्रतिबंधित प्लॅस्टिक व थर्माकोल प्लेट्स विकत घेऊ नये व वापरू नये. अन्यथा आपल्या कचऱ्यात जरी या बाबी आल्या तरी आपणा विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना लातूर महानगरपालिका उपायुक्त वीणा पवार यांनी केले आहे.
सदरची कारवाई लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा लातूर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. यापुढेही अश्या प्रकारच्या कारवाई या तीव्र करण्यात येणार असून ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण शंभर टक्के करण्यात तसेच सुका कचरा सत्तावीस वेगवेगळ्या प्रकारात जसे कपडे ,काचा ,लोखंड,पुठ्ठा, इत्यादी या प्रकारे करण्यात लातूर महानगरपालिका भर देणार आहे असे सांगण्यात आले. सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानास सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेने केले आहे.