वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंचायत समिती लोहारा व तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडेसे मायाबापासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दि. ५ ते २७ मे या कालावधीत गावातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडेसे मायाबापासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीमध्ये दि. ५ ते २७ मे या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे अधिनिस्त आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत गावातील सर्व ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करून दुर्धर, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आवश्यक सेवा पुरविण्यात येणार आहे. या गावनिहाय आरोग्य तपासणीचा कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि. ४ मे च्या पत्रान्वये तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना कार्यवाहीस्तव कळविलेला आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्याकडे संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी केले आहे.