वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या खर्चाचा भार काही प्रमाणात उचलता यावा तसेच कोव्हिडच्या परिस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा उदात्त हेतू ठेवून, मुंबई महापालिकेच्या अंधेरीस्थित के-पश्चिम विभाग कार्यालयातील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी जमवलेल्या निधीमधून रूपये पन्नास हजार रकमेचा धनादेश सास्तूर निवासी दिव्यांग शाळेत आयोजित समारंभात प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे व दिव्यांग विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीस्थित सुरक्षा दलातील लोहाऱ्याचे भूमिपुत्र दिलीपराव कोकणे, त्यांचे सहकारी अधिकारी दिनेश पेंढारे (चिपळूण), भरत बोहड, संजय मंचेकर (मुंबई), नंदराम नलवाडे (जून्नर), सास्तूर येथील व्यापारी प्रदीप कोकणे, श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.एम.बालवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, प्रशालेतील शिक्षिका अंजली चलवाड तसेच शाळेतील कर्मचारी प्रविण वाघमोडे, सविता भंडारे, सुरेखा परीट, डी.एस.माने, शंकरराव गिरी, एन.सी.सुर्यवंशी, गोरक पालमपल्ले, संभाजी गोपे, सूर्यकांत कोरे, प्रयागताई पवळे, निशांत सावंत, सुनीता कज्जेवाड, किरण मैंदर्गी, डी.एस.सगर आदींची उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना दिलीपराव कोकणे म्हणाले की, सास्तूर सारख्या ग्रामीण भागात निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून मानवतेचे उदात्त कार्य होत आहे. या उपक्रमासाठी आमची ही छोटीशी मदत निश्चितच सहाय्यभूत ठरेल. भविष्यातही शाळेच्या मानवतावादी कार्यक्रमांना आमचे सहकार्य राहील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी केले. नादरगे म्हणाले की, कोविडमुळे शाळेसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रविण वाघमोडे यांनी तर बी.एम.बालवाड यांनी आभार मानले.