वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मिनिमंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गटांसाठी गुरुवारी (दि.२८) आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला. यात काही प्रमुख इच्छुकांचे मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण कधी जाहीर होणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. त्यानुसार इच्छुकांचे मतदारसंघात संपर्क ठेवणे सुरू झाले होते. अखेर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण काढण्यात आले. तालुक्यातील एकूण पाच गटांपैकी एक अनुसूचित जाती, दोन नामाप्र तर दोन गट खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती करिता राखीव असलेल्या कानेगाव गटातून चंद्रकला नारायणकर निवडून आल्या होत्या. परंतु हा गट आता नामाप्र करिता राखीव आहे. माकणी गटातून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे यांच्या पत्नी अश्विनी जवळगे या निवडून आल्या होत्या. परंतु हा गट आता नामाप्र करिता राखीव झाला आहे. त्यामुळे दिपक जवळगे यांना आता खुल्या प्रवर्गासाठी सुटलेल्या सास्तुर किंवा जेवळी गटाचा पर्याय निवडावा लागणार आहे. सास्तुर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल राहुल पाटील या निवडून आल्या होत्या. हा मतदारसंघ खुला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील हे स्वतः निवडणुकीस सामोरे जाण्याची शक्यता आहे. तसेच मागील निवडणूकीत काँग्रेसकडून उमेदवारी घेतलेले शत्रूघन साळुंके हे पुन्हा एकदा याच मतदारसंघातुन उभे राहण्याची शक्यता आहे. जेवळी गटातून काँग्रेसच्या शोभा तोरकडे या निवडून आल्या होत्या. यावेळीही हा मतदारसंघ खुला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास संधी मिळणार आहे. याठिकाणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा जेवळीचे सरपंच मोहन पनुरे हे यावेळीही नशीब आजमावण्याची शक्यता आहे. सालेगाव हे गाव मागील निवडणुकीत सास्तुर मतदारसंघात होते. परंतु गटांच्या पुनररचनेत हे गाव जेवळी गटात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके जेवळी किंवा सास्तुर यापैकी एका गटातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नव्याने तयार झालेला आष्टाकासार हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांची कोंडी झाली आहे. कारण मागील निवडणुकीत त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला होता. त्यामुळे तेंव्हापासून त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवून तयारी केली होती. विशेष म्हणजे नव्याने अस्तित्वात आलेला हा आष्टाकासार मतदारसंघ त्यांच्यासाठी खूप फायदेशीर झाला होता. परंतु आता त्यांचा नाईलाज झाला आहे.
एकंदरीत यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावली जाणार हे नक्की आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. कोण कोणासोबत आघाडी करणार की सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार हे सध्या तरी स्पष्ट झाले नाही. मागील काही दिवसांपूर्वी राज्यात बदललेल्या सत्ता समिकरणांचा मोठा परिणाम या निवडणुकीवर होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
————-
दोन तालुकाध्यक्षांचा झाला हिरमोड
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील हे कानेगाव मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सुटेल या आशेने तयारी करत होते. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आष्टाकासार गटातून तयारी केली होती. परंतु आरक्षण सोडतीत कानेगाव व आष्टाकासार गट राखीव झाले आहेत. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पनुरे यांचा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राहिल्याने दोघेही खुश असल्याचे दिसून येत आहे.