लोहारा / सुमित झिंगाडे
धाराशिव, लातूर, सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचा चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या लोहारा येथील जगदंबा मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष उमाकांत मधुकरराव लांडगे (वय – ५२ वर्ष) यांच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारात आणि धनगर समाजावर शोककळा पसरली आहे.
मागील काही महिन्यांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. अखेर गुरुवारी (दि. ८ डिसेंबर) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी (दि. ९ डिसेंबर) सकाळी लोहारा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई असा परिवार आहे.
लोहारा तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक तळमळीचा कार्यकर्ता अशी उमकांत लांडगे यांची ओळख होती. ९०च्या दशकात लोहारा शहरात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असताना आपल्या ऐन उमेदीच्या काळात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन उमाकांत लांडगे यांनी शिवसेना पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. लोहारा शहरात शिवसेना पक्ष रुजविण्याचे आणि वाढविण्याचे श्रेय उमाकांत लांडगे यांना जाते. या काळात त्यांनी शिवजयंतीसारखे उत्सव साजरे करून युवकांमध्ये शिवविचार भिनविण्याचे काम लांडगे यांनी केले.
कालांतराने त्यांनी धनगर समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी यशवंत सेना, जय मल्हार सेना, राष्ट्रीय समाज पक्ष अशा विविध संघटनांच्या माध्यमातून कार्य केले. धाराशिव, लातूर, सोलापूर या तीन जिल्ह्यातील धनगर समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यातही त्यांनी सातत्याने आपले योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे धनगर समाजाची मोठी हानी झाली असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.