वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागच्या परिसरात एक जखमी अवस्थेत काळा आवक या नावाचा पक्षी दिसला असता त्यावर निसर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मिळून त्याच्यावर उपचार करून त्या पक्षाला जीवन दान दिले आहे.
गुरुवारी (दि. १९ ) सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर काळा आवक या जातीचा पक्षी जखमी अवस्थेत बसला होता. त्याच्या पंखांना जखम झाल्याने त्याला आकाशात उडता येत नसल्याने तो तिथेच पडून होता. लहान मुले त्या पक्षाला दगड मारत होती. हा प्रकार शहरातील नागरिक चिदानंद स्वामी यांना दिसला. त्यांनी त्या लहान मुलांना तेथून परत पाठवले व त्यानंतर स्वामींनी जखमी पक्षाला पकडून शहरातील निसर्गप्रेमी, सर्पमित्र श्रीनिवास फुलसुंदर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर निसर्ग संवर्धन संस्थेचे विरेश स्वामी, शैलेश जट्टे, अंकुश परीट, अमित बोराळे, अमोल माळी यांनी त्या जखमी पक्षावर उपचार केला असून वेळीच उपचार केल्यामुळे जखमी झालेल्या काळा आवक पक्षाला जीवनदान मिळाले. उपचारानंतर शुक्रवारी (दि. २०) त्या पक्षाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.
काळा आवक हा पक्षी आवाकाद्या पक्षीकुळातील दक्षिण आशियात आढळणारी प्रजाती आहे. हा पक्षी साधारण ६८ से.मी. आकाराचे असतात. यांचा मुख्यरंग हा विटकरी काळा असून चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा शुभ्र भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभाव असून डोक्याचा मुख्यरंग काळा तर त्यावर मागील बाजूस साधारण त्रिकोणी आकाराचा ठळक लाल तुरा असतो अशी माहिती निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास फुलसुंदर यांनी सांगितले.