वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खा. सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पिक विमा प्रश्नात वैयक्तिक लक्ष घातले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी दिली आहे.
याबाबत अनिल जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, दि.१९ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून पिक विमा प्रश्नासंदर्भात त्यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान दाखल केलेल्या याचिका, दिला गेलेला निकाल, शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील इत्यादीबाबत सविस्तर अशी चर्चा झाली. प्रलंबित खरीप २०२० -२१ पिक विमा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ६ मे रोजी ऐतिहासिक निर्णय दिला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांना सहा आठवड्यात पिक विमा देण्याचे उच्च न्यायालयाकडून कंपनीला आदेश झाले आहेत. त्या अनुषंगाने मुंबईत चर्चा झाली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण दाखल झालेल्या पिक विमा संदर्भातील याचिका, माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निकाल व त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कशा प्रकारे वर्ग करता येईल त्या संदर्भातील उपाय योजना इत्यादींची सविस्तर माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली. तसेच या संदर्भात कृषिमंत्री, कृषी आयुक्त, कृषी सचिव व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांना फोनवरून सूचित केले असल्याचे जगताप यांनी सांगितले.