लोहाऱ्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी गुरुवारी (दि.३) हे आदेश काढले आहेत.
लोहारा गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार शिक्षण विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुरुवारी (दि.३) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी लोहारा गटशिक्षणाधिकारी पदाबाबत एक आदेश काढला आहे. यात म्हणले आहे की, लोहारा गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी यांची विनंती बदली शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे झाल्याने गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सेवा ज्येष्ठतेनुसार उस्मानाबाद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद यांचेकडे सोपविण्यात येत आहे. रंजना मैंदर्गी यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोहारा या पदाचा अतिरिक्त पदभार असरार सय्यद यांच्याकडे हस्तांतरित करून पदमुक्त व्हावे असे आदेश प्रांजल शिंदे यांनी दिले आहेत.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लोहारा तालुका शाखेच्या वतीने बुधवारी (दि.२) लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मैंदर्गी यांच्याकडून अनेक शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला होता. अखेर लोहाऱ्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी मैंदर्गी यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे.