वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी या भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.१६) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला. नायब तहसीलदार एम. जी. जाधव, उपसरपंच हनुमंत जगताप, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रवीण जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षक कोंडीबा जगताप, अंगणवाडी सेविका राधाबाई सूर्यवंशी, व्यंकट जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. व्यंकट चिकटे यांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी नायब तहसिलदार एम.जी. जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी आपले काम हे संत तुकोबांच्या अभंगाप्रमाने असावे. समाजातील विघातक प्रवृत्तीने कितीही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते जनमाणसांच्या मुखातून बाहेर पडावे’ असे प्रतिपादन करून संत गाडगेबाबा यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमदान करून आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा प्रारंभ झाला असून या शिबिरास उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या शिबीराचा समारोप २२ जानेवारीला होणार आहे.