वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ज्यांच्या कार्याची नोंद घेतल्याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास अपूर्ण आहे असे थोर क्रांतिकारक कै. दत्तोबा भोसले यांच्या जीवनावरील ‘क्रांतिवीर दत्तोबा भोसले (मातोळकर) या स्मृती ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी ( दि. २६) औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार उत्तमसिंग पवार, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, ज्येष्ठ विधिज्ञ शशिकुमार चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र भोगले, पद्माकर मुळे, मानसिंग पवार, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी मंत्री अनिल पटेल, महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे आदी मान्यवरांच्या हस्ते या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक विवेक भोसले व भोसले परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी क्रांतिवीर दत्तोबा भोसले या स्मृती ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीचे संपादक प्रा. विजय चव्हाण, डॉ. विजय पाथ्रीकर, संतोष लिंबे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना कै. दत्तोबा भोसले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, त्यांनी केलेले कार्य, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील त्यांचे योगदान याबद्दल माहिती सांगितली. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात कै. दत्तोबा भोसले यांचे शिक्षण झाले. स्त्रियांच्या हक्कासाठी व शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ते अत्यंत पुरोगामी विचाराचे होते आदी माहिती मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना दिली.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे म्हणाले,
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास नव्याने लिहिणे आवश्यक आहे. ज्या काळात आपण गावच्या वेशीच्या बाहेरही गेलो नव्हतो, त्या काळात कै. दत्तोबा भोसले हे शिक्षणासाठी बडोद्याला गेले होते. त्यांचे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील योगदान खूप मोठे आहे. उद्योजक विवेक भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.