वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी होत असून सकाळी ८ पासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे विजयी चौकार मारणार की भाजपाचे किरण पाटील परिवर्तन करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले असून, 700 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे विक्रम काळे यावेळी विजयी चौकार मारणार की, भाजप परिवर्तन घडवून आणणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात असून, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. विभागात 61 हजार 529 शिक्षक मतदारांपैकी 53 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.