वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी (दि.१) तहसीलदार मार्फत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बदल अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य करणारे, देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ही परप्रांतियांच्या जिवावर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आणि तमाम जनतेचा अपमान करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा राज्यपाल कसा असू शकतो ? ज्याला आपण काय बोलतोय हेच लक्षात रहात नाही अशा बेभान वक्तृत्व करणाऱ्या व्यक्तीची राज्यपाल पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी व सर्व समावेशक राज्यपालाची नियुक्ती करण्यात यावी. महाराष्ट्रातील जनता राज्यपाल कोश्यारी यांच्याच्या बेताल वक्तव्यामुळे अत्यंत संतप्त आहे. वारंवार महाराष्ट्रातील जनतेला हिनविणे व वारंवार आपल्या भाषणाच्या माध्यमातून महापुरूषांची बदनामी करणे हे एकमेव धोरण राज्यपालांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात केलेला आहे. त्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो. अशा महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाला महाराष्ट्रच्या राज्यपालपदी राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांची तात्काळ राज्यपाल पदावरून उचल बांगडी करावी आणि सद्सद्विवेक बुद्धीने पदभार सांभाळू शकणाऱ्या पात्र व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडेल असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, तालुका कार्याध्यक्ष बालाजी यादव, उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, सचिव खंडु शिंदे, कोषाध्यक्ष छगन फुलसुंदर, प्रसिद्धी प्रमुख प्रणील सुर्यवंशी, अभिजित सुर्यवंशी, तानाजी पाटील, प्रशांत थोरात, सुनिल भोजराव, धनराज चंडके, अजय शिंदे, परमेश्वर मुळे, सोमनाथ भोजराव, धनराज गिरी, आकाश यादव, सहदेव जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.