मान्सून चालू झाल्यापासून एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीसाठी खरेदी केलेल्या कृषी निवेष्ठा जशास तशा पडून असल्यामुळे दुष्काळ जाहीर करून अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुका स्वराज्य संघटना यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बुधवारी (दि.१२) निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस न पडल्यामुळे जनावरांचा चारा नसल्यामुळे जनावरे उपाशी मरत आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्याची मागणी ही करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षीचा खरीप व रब्बीचा राहिलेला पिक विमा त्वरित देण्यात यावा. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी, वाळलेल्या उसाचे पंचनामे करून मदत देण्यात यावी व सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत ही देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील, कार्याध्यक्ष युवराज साळुंके, सचिव बळी गोरे, संजय मुरटे, शेतकरी बालाजी मुळे, महेश सुतार, राजाभाऊ मुळे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.