वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १ ऑगस्ट पासून मोहीम सुरू केली आहे. मंगळवार अखेर लोहारा तालुक्यातील चोवीस हजार पाचशे ८८ मतदारांची आधार जोडणी पूर्ण झाली आहे.
मतदारयादीत दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असण्याबसारखे दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदान ओळखपत्राला आधार लिंक करण्या्ची मोहिम राबविण्याचा निर्णय भारत निवडणुक आयोगाने घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत मतदाराचे मतदान ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जात आहेत. लोहारा तालुक्यातील ९४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी काम करीत आहेत. विशेष म्हणजे निवडणुक आयोगाने घर बसल्या मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आधार लिंक करणे सोपे झाले आहे. याबाबत तहसीलदार संतोष रुईकर यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आधारकार्डची गोपनीयता पाळून मतदान कार्डाला आधार लिंक करण्याची सूचना दिली आहे.
या मोहिमेअंतर्गत रविवारी (दि.११) तालुक्यातील ९४ मतदान केंद्रावर आधार जोडणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार संतोष रुईकर, नायब तहसिलदार डी. पी. स्वामी, लिपिक वजीर अत्तार यांनी लोहारा बु. भातागळी, कानेगाव, माकणी, सास्तुर, तावशीगड आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. लोहारा तालुक्यात एकूण ९३ हजार चारशे ८३ मतदार असून त्यापैकी मंगळवार (दि. १३) अखेर चोवीस हजार पाचशे ८८ मतदारांची आधार जोडणी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील मतदारांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधून मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडून घ्यावे असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.