लोहारा तालुक्यातील तीन मंडळात मंगळवारी (दि.१६) फेरफार अदालत घेण्यात आली. यात एकूण २५ फेरफार मंजूर करण्यात आले आहेत.
एक महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्याच्या अनुषंगाने जिल्हयाभरात मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी भरविण्यात येईल. तेव्हा सर्व संबंधित शेतकऱ्यांनी फेरफार अदालतमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी शेतकऱ्यांना केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.११ मे २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. त्यामध्ये एक महिन्याचे वर प्रलंबित असलेल्या साध्या विवादग्रस्त फेरफरांची संख्या निश्चित करून दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार अदालत तहसिल आणि मंडळ स्तरावर आयोजित करण्यात यावी. तसेच महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या लगतच्या दुसऱ्या दिवशी फेरफार अदालत आयोजित करावी असे निर्देश देण्यात आले होते.
या फेरफार अदालत मोहिमेची मे महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ( दि.१६) पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. तालुक्यातील माकणी, जेवळी व लोहारा मंडळात घेण्यात आलेल्या या फेरफार अदालतीत एकूण २५ फेरफार मंजूर करण्यात आल्याचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी सांगितले.