वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आय सीड फाउंडेशनच्या वतीने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगाची ओळख करून देणे, भीती दूर करणे, कल्पना शक्तीला वाव देणे, यश-अपयश पचविण्याची क्षमता रुजविणे व त्यांचा आत्मविश्वास वाढवणे या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या स्पर्धेची सुरुवात भारताचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये एकूण १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. लहान गटात ५ वी ते ७ वी वर्गात शिकणाऱ्या तर मोट्या गटात ८ वी ते १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. लहान गटातून प्रथम क्रमांक आयुष जाधव, पद्मराज साठे, प्रशांत आलमले यांच्या मेरी क्युरी संघाने तर द्वितीय क्रमांक श्रद्धा कांबळे, निशा कांबळे, प्राची कांबळे यांच्या न्यूटन संघाले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शौर्य इंगळे, श्रीहरी साठे, सुरज नरुणे यांच्या सी. व्ही. रमण संघाने पटकाविले. मोठ्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिग्विजय कांबळे, मनोज पवार, अशोक कांबळे यांच्या एडिसन संघाने पटकावला. द्वितीय संकेत माकणीकर, श्रीनाथ क्षीरसागर व रोहन भोरे यांच्या सी. व्ही. रमण संघाने पटकावला तर तृतीय क्रमांकासाठी दोन संघात चुरशीची लढत झाली. शेवटी परीक्षकांना दोन्ही संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक घोषित करावे लागले. तृतीय क्रमांक लक्ष्मी शिंदे, सय्यद शकील व सलोनी शिंदे यांचा जयंत नारळीकर संघ व संभावी कलशेट्टी, श्रद्धा जाधव, दीपा ढोणे यांचा न्यूटन संघ या दोन संघांनी पटकावला. विजेत्या संघास पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आले.आय सीड सारख्या संस्थांनी ग्रामीण भागात असे उपक्रम होणे कौतुकास पात्र आहेत. मुलांचा उत्साह व प्रतिसाद पाहून भारावून गेलो आहे. शिक्षणाबरोबर अशा उपक्रमांमुळे या मुलांचे भविष्य उज्वल आहे असे प्रतिपादन मुंबई पोलिस दलात कार्यरत ए.पी.आय. ज्ञानेश्वर कारदोरे यांनी केले. पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, मोरे कोचिंग क्लासेसचे संचालक समाधान मोरे, किरण साठे, सोमनाथ कुसळकर व आयसीड विद्यार्थी कमिटी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक महेश शिंदे यांनी केले तर संस्थापक विष्णू शिंदे यांनी समारोप केला.