लोहारा / प्रतिनिधी
तालुक्यातील सास्तुर येथील निंबाळकर पेट्रोलियम यांच्या तर्फे शुक्रवारी ( दि. १८) कृषि मेळावा घेण्यात आला. यावेळी लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत लावण्यात आलेल्या स्टॉल च्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या कृषी मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या शीतल पाटील, गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, प्रगतशील शेतकरी माधवराव पाटील, एरिया सेल्स ऑफिसर परवेज आलम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी पेट्रोल डिझेल गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिक निंबाळकर पेट्रोल पंपचे व्यवस्थापक वेदप्रकाश निंबाळकर यांनी दाखवले. तसेच फिनो बँकचे व्यवहार पेट्रोल पंपावर होत आहेत. याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद सदस्या शितल पाटील यांनी रक्कम काढून माहिती घेतली. यावेळी लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले होते. याद्वारे बायोगॅस विकास कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सुरक्षित कीटकनाशकांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक कृषी अधिकारी किरण निंबाळकर यांनी दाखवले. यावेळी उदतपुर येथील प्रगतशील शेतकरी माधवराव पाटील यांनी स्वतः पॉवर टिलरवर तयार केलेले फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हे फवारणी यंत्र उपस्थित शेतकऱ्यांच्या आवडल्याचे निदर्शनास आले. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालया मार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या कृषी प्रदर्शनात ट्रॅक्टर, रोटावेटर, स्प्रेअर, महाधन रासायनिक खते, विविध ट्रॅक्टर औजारे आदीबद्दल माहिती सांगण्यात आली.