वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय व ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशन यांच्या वतीने दि.१५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती जागरण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यातील उपक्रमांचा भाग म्हणून बुधवारी (दि. १९) लोहारा तालुक्यातील होळी या गावातून ग्रंथदिंडी फिरवण्यात आली.या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत जागृती निर्माण करण्यात आली. तालुक्यातील होळी येथील स्वामी विवेकानंद भवन, ग्रामपंचायत कार्यालय, विट्ठल-रुक्मिणी मंदिर, आण्णाभाऊ साठे चौक, आण्णाभाऊ सांस्कृतिक भवन या मार्गे विद्यार्थी व नागरीकांच्या उपस्थितीत ही ग्रंथदिंडी फिरवण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयात ग्रंथदिंडीला विश्राम देवून उपस्थित समूदायाला वाचन संस्कृती रुजवण्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ओम बिराजदार हे होते. यावेळी प्रमोद माने, शिक्षक करण बाबळसुरे यांनी उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांना भक्कम समाज बांधणीसाठी वाचन कसे महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर पंधरवड्यातील उपक्रमांतर्गत उमरगा शहरातून काढलेल्या पुस्तक पालखीत जमलेली पुस्तके होळी येथील वाचनालयाला देण्यात आली. ही पुस्तके वाचनालयाच्या नोंदवहीत नोंदवून वाचकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर वाचनालयामार्फत यापूर्वी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रत्येकी रु.१०१/- चे मानधनपर बक्षिसही देण्यात आले.वाचनालय व फाऊंडेशनच्या वाचन संस्कृती रुजवण्यासाठीच्या धडपडीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, केशव सरवदे, व्यंकट जाधव व कृष्णा सरवदे यांनी परिश्रम घेतले. होळीनंतर काळ निंबाळा, कदमापूर, कोळसूर, बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव याठिकाणी पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांनी यावेळी दिली.