वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विंधन विहिरीचे रखडलेले काम तात्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत काळे यांनी मंगळवारी (दि.५) सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर विंधन विहिरीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल याबाबत नगरपंचायतीच्या वतीने दुपारच्या सुमारास लेखी पत्र दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक क्रमांक ४ मधील विंधन विहिरीचे रखडलेले काम तात्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत काळे यांनी मंगळवारी (दि.५) सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी सोमवारी (दि.४) नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग ४ मध्ये आमदार निधीतून २ ठिकाणी विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. हे काम करण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
परंतु संबंधित ठेकेदाराने हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे इतर स्रोत उपलब्ध नसल्याने प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. त्यामुळे मी हे आमरण उपोषण करत असल्याचे या निवेदनात म्हटले होते. नगरसेवक काळे यांनी मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हे उपोषण सुरू केले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयाने नगरसेवक काळे यांना लेखी पत्र दिले. त्यात म्हणले आहे की, आपल्या प्रभागातील विंधन विहिरी घेण्यासाठी चा कार्यारंभ आदेश संबंधित कंत्राटदाराला यापूर्वीच दिला आहे. परंतु सदर कंत्राटदाराने अद्यापपर्यंत विंधन विहिरीचे कामे केलेली नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारास कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर हे कामे लवकरात लवकर करण्यात येतील असे कंत्राटदाराने कार्यालयास कळविले आहे. त्यामुळे आपण हे उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे असे लेखी पत्र दिल्यानंतर हे नगरसेवक प्रशांत काळे यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे, अभिमान खराडे, अमोल बिराजदार, नगरसेवक विजय ढगे, आरिफ खानापुरे, दिपक मुळे, के. डी. पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.