वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीची निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्व पक्षांच्या इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.२४) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचे समजताच इच्छुकांची लगबग दिसून येत आहे.
एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडती करिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घेण्यात यावा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ नोव्हेंबर रोजी काढला. त्यामुळे लोहारा नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्याकरिता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार दि.१५ नोव्हेंबर ला प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत लोहारा तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण १७ प्रभागापैकी प्रभाग क्रमांक ११ व १२ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यात प्रभाग ११ महिलांसाठी राखीव झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक ८, १०, १६, १७ आरक्षित झाले आहेत. त्यापैकी प्रभाग ८ व १७ महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ११ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ७, १५ सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक १, २, ६, ९, १३, १४ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.
नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.२४) राज्यातील नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक जाहीर झाल्याचे समजताच इच्छुकांची लगबग दिसून येत आहे. जाहीर कार्यक्रमानुसार दि. ३० नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत वेबसाईटवर नामनिर्देशनपत्र भरता येतील. दि. ८ डिसेंबर ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दि. १३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. दि. २१ डिसेंबर ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. त्यानंतर दि. २२ डिसेंबर ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.