वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४ मधील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी सोमवारी (दि.२९) नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरपंचायतच्या वतीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात असे लेखी पत्र देण्यात आले.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन व चार मधील पाणीपुरवठा सुरळीत नाही. याप्रकरणी नगरसेवक प्रशांत काळे यांनी शुक्रवारी (दि.२६) नगरपंचायत कार्यालयास निवेदन दिले होते. त्यात म्हणले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून एक, दोन, तीन व चार प्रभागात पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. मुख्य जलवाहिनी फुटल्याचे कारण नगरपंचायत प्रशासनाकडून सतत सांगितले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पाणी नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे आमची मानसिकता हतबल होत आहे. त्यामुळे तात्काळ पाण्याची सोय करण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात यावे. अन्यथा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सर्व नागरिकांच्या वतीने सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा नगरसेवक प्रशांत काळे यांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात दिला होता.
त्याप्रमाणे सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घागर मोर्चा काढण्यात आला. भवानी चौक येथून मोर्चास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयासमोर सर्व मोर्चेकरी यांनी बसून नगरपंचायत विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांना पाणी न देणाऱ्या नगरपंचायतचा धिक्कार असो, हायमास्ट लाईट सुरू न करणाऱ्या नगरपंचायतचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी हरी लोखंडे, दत्ता स्वामी, दिपक मुळे यांनी नागरिकांच्या अडचणी मांडल्या. या मोर्चात नगरसेवक प्रशांत काळे, दिपक मुळे, विजयकुमार ढगे, के. डी. पाटील, हरी लोखंडे, बाळू पाटील, विजय महानुर, श्यामसुंदर नारायणकर, वीरभद्र फावडे, रामेश्वर वैरागकर, सुनील ठेले, तुकाराम विरोधे, दत्ता स्वामी, प्रेम लांडगे, मल्लिकार्जुन बनशेट्टी, सुनील देशमाने, समीर शेख, राहुल रेणके, पंडित लोहार, अल्लीशेर बागवान, सय्यद इनामदार, चेतन पवार, तुलसी काळे, लिंबाबाई कुंभार, कांचन खताळ, सुवर्णा महानुर यांच्यासह अनेक महिला नागरिक सहभागी झाले होते.
त्यानंतर काही वेळाने नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिले. त्यात म्हणले आहे की, प्रभाग क्र. १ ते ४ मध्ये जुनी पाणीपुरवठा योजनेची ५० ते ५५ वर्षांपुर्वीची पाणीवितरण व्यवस्था आहे. सदरची पाणी वितरण व्यवस्था जुनी असल्याने ब्लॉक झाली आहे. सदरची पाणी पुरवठा लाईन दुरुस्त करण्याचा पुरेपुर प्रयत्न नगरपंचायतीने केला आहे. जुन्या पाईप लाईनर मोठया प्रमाणात घरे उभारलेली असल्याने ब्लॉक झालेली पाणी लाईन सापडत नाही. यामुळे नगरपंचायती कडुन मंजुर असलेल्या दोन बोअरवेलचे काम ३१/०८/२०२२ रोजी अखेर पुर्ण होईल. तसेच नविन पाईप लाईन टाकणे बाबत प्रस्ताव कौन्सिलकडे प्रस्तावित केलेला आहे. आज मितीस वर नमुद प्रभागामध्ये अस्तित्वात असलेल्या बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे. बंद असलेल्या बोअरवेल तात्काळ सुरु करून घेणेत आलेल्या आहेत. तसेच नविन पाणीपुरवठा लाईनचे काम कौन्सिलची मंजुरी मिळताच काम सुरु होईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. लेखी पत्र देतेवेळी नगराध्यक्ष वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, सभापती मयुरी बिराजदार, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे आदी उपस्थित होते.