वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पंचायत समितीच्या कृषि विभागामार्फत कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.१) कृषि दिन साजरा करण्यात आला.
लोहारा पंचायत समिती कृषि विभागामार्फत कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून तालुक्यातील हिप्परगा (रवा) प्रगतशील शेतकरी शकुंतला कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित तालुका कृषि अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बीज प्रक्रियाचे महत्त्व व आधुनिक पद्धतीने शेती करणेबाबत सांगितले.
तसेच लोहारा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी श्री मुळे व कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेबाबत माहिती दिली. यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कानेगाव प्रभागातील ४० महिला शेतकरी बचतगटांना तुरीचे बियाणे व रायझोबियम, पीएसबी बिज प्रक्रियेसाठी वाटप करून सुरक्षित कीटनाशकांचा वापरासाठी फवारणी सुरक्षा किटचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांचा हस्ते पंचायत समिती आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन किरण निंबाळकर व विनोद पवार यांनी केले. यावेळी पंचायत समिती कार्यालयातील व तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.