वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलीस ठाण्याच्या परिसरातील घडलेल्या अपघातातील, गुन्ह्यात जप्त केलेली वाहने मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली आहेत. सदरील वाहने ज्यांची आहेत त्यांनी वाहनांची कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत असे आवाहन प्रभारी पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी केले आहे.
लोहारा परिसरात घडलेल्या अपघातातील, बेवारस स्थितीत आढळून आलेली, विविध गुन्ह्यातील जप्त केलेली अनेक वाहने धूळखात पडली आहेत. बेवारस ३ दुचाकी व ३ चारचाकी वाहने तसेच कोर्टातून निकाल लागलेल्या गुन्ह्यातील ४ दुचाकी व १ चारचाकी असे एकूण ११ वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. सदरील वाहने ज्यांची आहेत त्यांनी वाहनांची मूळ कागदपत्रे दि २८ मे पर्यंत लोहारा पोलीस ठाण्यात घेऊन येऊन वाहनांची ओळख पटवून घेऊन जावीत असे कळविण्यात आले आहे. त्यानंतर सदरील बेवारस वाहनांचे संबंधित कोणीही मालकी हक्क सांगत नसल्याचे गृहीत धरून दि. ३० मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्याच्या परिसरात सदरील वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी सांगितले आहे.