वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील खते, शेती उपयोगी साहित्याच्या गोडाऊन मधील साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एक लाख पंचेविस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, लोहारा शहरात तहसील रोडवरील माशाळकर कॉम्प्लेक्स येथे योगेश देवकर यांचे श्री शिरोमणी कृषी कृषी सेवा केंद्र हे दुकान आहे. या दुकानाचे खत कास्ती रस्त्यालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठे गोडाऊनमध्ये ठेवले जाते. सदर कृषी सेवा केंद्रामध्ये अपुऱ्या जागेमुळे अतिरिक्त खत गोडाऊन मध्ये ठेवले जाते व तेथूनच शेतकऱ्यांना दिले जाते. दि. २२ जुलै रोजी दुपारी दोन च्या दरम्यान गोडाऊनच्या शटरच्या खालील विटांचे भाग पोखरून चोरी झाल्याचे गोडाऊनच्या शेजाऱ्याला निदर्शनास आले. त्यामुळे गोडाऊन शेजाऱ्याने कृषी दुकानदारास भ्रमणध्वनीद्वारे कळवले. दुकान नंबर सात मध्ये असलेल्या या गोडाऊन मध्ये दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन शटरच्या खालील वीट सिमेंटचे बेसमेंट तोडून ५० पोते खतासह अन्य साहित्य असे एकूण एक लाख पंचेविस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद उमराव देवकर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांत अशा लहान मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.