वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवास शनिवारी (दि.१८) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजता शंभू महादेव मूर्तीची व मानाच्या काठीची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
महाशिवरात्री निमित्त शहरातील महादेव मंदिरात सजावट करण्यात आली होती. पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी दहाच्या सुमारास शहरातील जगदंबा मंदिरापासून महादेवाच्या मूर्तीची व मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी सरपंच नागण्णा वकील, शंकर जट्टे, पोलीस निरीक्षक अजितकुमार चिंतले, नगरसेवक जालिंदर कोकणे, विजयकुमार ढगे, माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, हरी लोखंडे, सतीश ढगे, मोहन वचने, गोपाळ सुतार, विठ्ठल वचने, के.डी. पाटील, नाना पाटील यांची उपस्थिती होती. जगदंबा मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती करण्यात आली. त्यानंतर पोलिस ठाणे रोड, आंबाबाई चौक, गणेश मंदिर चौक मार्गे महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भजनी मंडळ सहभागी झाले होते. त्यानंतर महादेवाच्या मूर्तीची व पिंडीची विधिवत पूजा करण्यात आली.
महादेव मंदिर परिसरात दुपारी भारूडाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी गोपाळ सुतार, विरेश स्वामी, महेश कुंभार, किरण पाटील, दत्ता निर्मळे, अमित बोराळे, स्वप्नील माटे, बळी रणशूर, बबन रणशूर, अकुंश परीट, सुनील देशमाने, रघुवीर घोडके, नागेश जट्टे, वैजिनाथ माणिकशेट्टी, संजय पळसे, ईश्वर बिराजदार, ओम पाटील, मनोज लोहार, शंभू स्वामी, सचिन माळी, संतोष शेवाळे, प्रभाकर बिराजदार, बालाजी माळी, सुधाकर बिराजदार आदींनी पुढाकार घेतला. महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त पुढील ३ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.१९) सकाळी ११.३० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३१ तोळे चांदीची महादेवाची पिंड जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. सोमवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता महादेव मंदिरात महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री ७ वाजता कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेनंतर यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.