वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोहारा पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि.२८) ग्राम बाल संरक्षण समीतीचे प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणात बालविवाह निर्मुलनासाठी सामुहिक शपथ घेण्यात आली.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन लोहारा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके, हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे लोहारा तालुका समन्वयक सतिश कदम, एकल महिला संघटनेचे राज्य संघटक विजय जाधव, समन्वयक अधिकारी अरविंद थोरात, लोहारा तालुका संरक्षण अधिकारी रवि धनवे, उमरगा पोलिस ठाण्याच्या महिला समुपदेशक राऊबाई भोसले, समुपदेशक जयश्री पाटील, वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशक देवकन्या हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षणामधे बालविवाह अधिनियम २००६, बालविवाह निर्मुलन, बाल न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम, लैंगिक संरक्षणापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम या संदर्भात प्रशिक्षण देऊन समीतीचे सक्षमीकरण करण्यासाठी या प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. बालकामगार, बालभिक्षेकरी यांचे निर्मुलन, ग्राम बाल संरक्षण समीती मधील समन्वय, काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालक ओळखुन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना, बालसंगोपन योजना आदी विषय या प्रशिक्षणात घेण्यात आले.
या प्रशिक्षणात जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके, हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे तालुका समन्वयक सतीश कदम,समुपदेशिका राऊबाई भोसले, जयश्री पाटील,सखी वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशक देवकन्या हिंगणे यांनी विविध विषयांवर माहिती देत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद थोरात यांनी केले. सूत्रसंचालन राऊबाई भोसले यांनी तर जयश्री पाटील यांनी आभार मानले.