वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला शनिवारी (दि.१८) पासून सुरुवात होणार आहे. यात्रा महोत्सवाचे हे २३ वे वर्ष आहे. यात्रा महोत्सवात सलग ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१८) महादेवाची मानाची पालखी व काटीची पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात व हरिहर भजनी मंडळाचे वारकरी व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकीचे आगमन होताच महादेवाची आरती होईल.
त्यानंतर ही पालखी मिरवणूक जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१९) सकाळी ११.३० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३१ तोळे चांदीची महादेवाची पिंड जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सकाळी १० वाजता महादेव मंदिरात महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री ७ वाजता कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चौथ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेनंतर यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.