वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये सोमवारी (दि.१४) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण समितीचे शंकर जाधव हे होते. यावेळी बाबुराव पोतदार, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्कूलमधील चिमुकल्यांना मार्गदर्शन करताना शंकर जाधव यांनी सांगितले की, नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असत. आणि प्रेमाने मुले त्यांना चाचा नेहरू असे म्हणत. प्रत्येक लहान मुलांनी या वयात आपल्या आई वडीलांनी व शिक्षकांनी दिलेले संस्काराचे आचरण करावे, आपला अभ्यास पूर्ण करून , सातत्य, परिश्रम व जिद्दीने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर त्यांनी देशभक्तीपर बालगीत व बडबडगीत म्हणायला लावून कार्यक्रमात आनंदी वातावरण निर्माण केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर सुरवसे, प्रेमदास राठोड, संचिता बाचपल्ले, मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, सारिका पवार, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, अस्मिता देवकते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी घंटे यांनी तर व्यंकटेश पोतदार यांनी आभार मानले.