वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहर व परिसरात शनिवारी ( दि. १०) सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
मागील काही दिवसांत लोहारा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळाने पावसाचा जोर वाढला. दुपारी साडे बाराच्या सुमारास तर जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी हा पाऊस आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक प्रभाग चिखलमय झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मागील तीन दिवसांपूर्वी ही लोहारा शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कानेगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. तसेच तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथेही जोरदार पाऊस झाला होता. या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. तसेच ओढ्याच्या पाण्यात चार जनावरे वाहून गेली होती.
सततच्या पावसाने पिके धोक्यात
मागील काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे खरीप पिकांना फटका बसत आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने सोयाबीनला पाणी लागून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.