मुंबई –
वरळी, मुंबई येथे दि. ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित मराठी तितुका मेळवावा या विश्व मराठी साहित्य संमेलनात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवडा येथील रुमा स्वयं सहाय्यता समूहाची स्टॉलसाठी निवड करण्यात आली होती. या संमेलनात रूमा समूहाने आपल्या पारंपारिक व डीझायनर गोधडीचा स्टॉल लावला होता. सदर प्रदर्शनात ३ दिवसात वीस हजार रुपयांची विक्री झाली असून दहा हजार रुपये गोधड्यांची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. या स्टॉलला विविध मंत्री महोदयांनी तसेच मराठी साहित्यिक, कलावंत यांनी भेट दिली.
त्यांच्या या कार्याची शिक्षणमंत्री दिपक केसरकर, चला हवा येऊ द्या फेम मराठी कलावंत डॉ. निलेश साबळे, योगेश शिरसाट, अभिनेत्री स्पृहा जोशी इत्यादींनी स्तुती केली आहे. स्वतः गोधडीची खरेदी देखील करून गटाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रकल्प संचालक प्रभू जाधव व जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी रूमा गटाच्या संचालिका रुक्मिणी पटसाळगे व गटातील सर्व सहभागी महिला यांचे अभिनंदन केले. जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुराळे व तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी गटाला सहभाग नोंदविण्यासाठी प्रेरित केले.