वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरी मागत बसण्यापेक्षा एखादा व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा बना असे आवाहन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीपर्णा चौधरी, प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना भगत, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अभिजीत लोभे, आयुब शेख, पशुधन विकास अधिकारी डॉ. जुनेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अमित रंजन यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप कल्चर, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मुद्रा योजना याविषयी माहिती देऊन व्यवसाय कसा व कोणता सुरु करायचा याविषयी मार्गदर्शन करून केंद्र आणि राज्य शासनाच्या उद्योगासंबंधी असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. तसेच या महाविद्यालयात सुरू होणाऱ्या इंक्युबॅशन सेंटरच्या माध्यमातून लोहारा तालुक्यातील ज्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. श्रीपर्णा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक लोकांच्या गरजा ओळखून व्यवसाय सुरू करा असा सल्ला देऊन व्यवसायाचे व्यवस्थापन, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग यावरती सविस्तरपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तौफिक कमाल यांनी तर प्रा. चिकटे यांनी आभार मानले.