वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने कंबर कसली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई राखण्याच्या प्रयत्नांसह भाजपचा गड बनलेल्या उत्तर प्रदेशात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असतानाच ठाकरे यांनी पक्ष आणखी ताकदीने वाढवण्यावर भर देत आता उत्तर प्रदेशातील ३० जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची निवड केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे वर्चस्व असतानाही ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन पक्ष संघटनेवर भर देण्याचा प्रयत्न केला. अगदी त्याच पद्धतीने आता शिवसेनेकडून भाजपचे प्राबल्य असलेल्या राज्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेशात ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर भर दिला आहे आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील बडे नेतेही उत्तर प्रदेशात असणार आहेत. केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेचे उमेदवार राहणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेश मधील ३० जिल्ह्यात शिवसेनेने जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.