वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करता आला नाही. तरीही शेतकरी अजून संयम बाळगून आहेत. परंतु विमा कंपनी व सरकारने शेतकऱ्यांच्या या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा उद्रेक होईल असा ईशारा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (दि.२८) ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर बोलत होते. दिपक जवळगे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नामदेव लोभे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, पंडित ढोणे, माजी सभापती विलास भंडारे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, सरपंच सचिन गोरे, राम मोरे, पवन मोरे, प्रेम लांडगे, नितीन सूर्यवंशी, कुंडलिक सूर्यवंशी, माजी जि प सदस्य गुंडाप्पा भुजबळ, हरी लोखंडे, नागनाथ पवार, अभिजित साळुंके, माजी सरपंच शेखर पाटील, गणेश जाधव, संभाजी वडजे, नितीन जाधव, भगवान मक्तेदार, शुभम जावळे यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन ही विमा कंपनीने अद्याप पीक विम्याची रक्कम दिली नाही. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी अनेक अनुदान जाहीर केले. त्यातील काही अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सध्याचे हे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे पीकविमा कंपनी व सरकार विरोधात शेतकऱ्यांनी यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन करावे असे आवाहन केले. यावेळी माजी जि प सदस्य दिपक जवळगे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, हरी लोखंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लोहारा खुर्द, कानेगाव, हिप्परगा (रवा), चिंचोली काटे, धानुरी, मोघा यासह अनेक ग्रामपंचायतच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.